Welcome to CASP India

Azino

Phone

020-25860842

Visit

CASP Bhavan Pashan Baner Link Road, Pashan Pune

Azino

जलरंग व जलतरंग

१४-जुलै-२०२४,पुणे

रंगभाषा आणि स्वरभाषेचा अनोखा संवाद 

मिलिंद तुळाणकर आणि मिलिंद मुळीक यांची अनोखी जुगलबंदी -
जलतरंगाच्या सुरावटीवर साकारली चित्रकृती

जलतरंग वादनातून रागाच्या छटा उलगडत असतानाच कॅन्व्हासवर जलरंगांची झालेली आल्हाददायक उधळण यातून रसिक अनोखा कलाविष्कार अनुभवत रंग-तरंगांच्या निर्गुण नात्याचे साक्षीदार झाले.

निमित्त होते ‘जलरंग व जलतरंग’ या विशेष
कार्यक्रमाचे. ‘कास्प’ संस्थेतर्फे चित्रकार मिलिंद मुळीक यांच्या
चित्रांच्या प्रदर्शनीचे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातीळ कलादालनात भरविण्यात
आले होते. त्या वेळी रसिकांनी ही अनोखी अनुभूती घेतली.

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून चित्रकार मिलिंद मुळीक यांनी ‘कास्प’ला
भेट दिलेल्या चित्रांचा या प्रदर्शनात समावेश होता. बेलराईज इंडस्ट्रिजच्या कार्यकारी
संचालिका सुप्रिया बडवे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. खासदार डॉ. मेधा
कुलकर्णी, ‘कास्प’चे अध्यक्ष, माजी पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर यांची
यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

सुरुवातीस उमराणीकर यांनी ‘कास्प’च्या उपक्रमांची माहिती दिली. संस्थेच्या
उपक्रमांना समाजाकडून भरभरून सहकार्य मिळावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्‍त केली.
उद्‌घाटनपर मनोगत व्यक्‍त करताना सुप्रिया बडवे म्हणाल्या, कलेच्या माध्यमातून
शब्दांशिवाय संवाद साधता येतो यामुळेच कलेचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण
महत्त्व आहे. नैराश्येच्या गर्तेत जाणाऱ्या युवा पिढीला कलेच्या माध्यमातून उभारी मिळू
शकेल. डॉ. मेधा कुलकर्णी ‘कास्प’च्या कार्याविषयी बोलताना म्हणाल्या, एखादी
संस्था सातत्याने कार्यरत असण्यासाठी आर्थिक पाठबळाची आवश्यकता असते.
संस्थेला शासकीय स्तरावर मदत मिळवून देण्याचा आपला प्रयत्न राहिल.

जलतरंग वादक मिलिंद तुळाणकर यांनी कार्यक्रमाच्या वेळेनुरूप मधुवंती राग
जलतरंग वादनासाठी निवडून त्यातील आलाप, जोड, झाला प्रस्तुत केला. त्याच
वेळी चित्रकार मिलिंद मुळीक यांनी आपल्या कुंचल्यांमधून विविध रंगछटा
साकारत अतिशय सुंदर अशा निसर्गचित्राची निर्मिती केली. काळाच्या पडद्यावर उमटणारे
जलतरंगाचे सूर आणि अवकाशाच्या पटलावर साकारलेल्या रंगछटा यातून सूर
आणि रंगातील निर्गुण नाते शोधण्याचा अनोखा आविष्कार रसिकांना मोहित करून
गेला. या उपक्रमास पुणेकर रसिकांनी भरभरून दाद देत कलाविष्कार अनुभवला.

स्वागत जयंत उमराणीकर, अंजली राजे यांनी केले. सूत्रसंचालन ऋतुजा फुलकर यांनी केले तर आभार संचालक डॉ. सचिन बोधनी यांनी मानले.

Loading…